जगण्यासाठीच्या सवयींपासून सजग शिक्षणाकडे !!
आज दुपारी घडलेला एक छोटासा प्रसंग आमच्या समोर अनेक मोठे प्रश्न समोर आणून गेला. आमच्या झेप लर्निंग सेंटर मध्ये शिकायला येणारी पाचवीतील तीन मुलं त्यांच्या नेहमीच्या शाळेच्या रस्त्यावर एका हिवरच्या झुडपाजवळ उभी होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्या झुडपात इंडियन स्पॉटेड डव्ह (ठिपकेदार कबुतर) या पक्ष्याचे घरटे पाहिले होते. त्या घरट्यात अंडीही होती. सुरुवातीला हे त्या मुलासाठी केवळ कुतूहल होते; मात्र काही दिवसांतच ते कृतीत उतरले.मुलांनी झुडपाभोवती साधे फासे लावले होते.
ती मुल चर्चा करत होती, विषय होता पक्षी कसा पकडायचा आणि कुठे विकायचा. एका मुलाने सांगितले की हा पक्षी पन्नास रुपयांना विकता येईल आणि मिळालेली रक्कम आपापसात वाटून घेता येईल. त्याच वेळी त्यांनी ही गोष्ट आई-वडिलांपासून लपवण्याचेही ठरवले.काही वेळ निरीक्षण केल्यानंतर त्यांनी पाहिले की पक्षी पुन्हा अंड्यांवर बसण्यासाठी घरट्यात आली आहे. योग्य संधी साधून ते घरट्याजवळ गेले. काही क्षणांतच पंखांची जोरदार फडफड झाली आणि पक्षी त्यांच्या तावडीत सापडला.
पक्षी पकडल्याच्या आनंदात ते रस्त्यावर धावत सुटले.जेव्हा त्यांना थांबवून विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात भीतीत बदलला. त्यांचे पहिले शब्द होते दादा, बाबांना सांगू नका.
आता ही घटना केवळ एका पक्ष्याला पकडण्याची नव्हती. ती मुलांच्या सामाजिक वास्तवाशी आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेली होती. कारण ही मुलं फासेपारधी समुदायातील आहेत.ऐतिहासिकदृष्ट्या शिकार हा या समुदायाच्या उपजीविकेचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. काळ बदलला, कायदे बदलले, उपजीविकेची साधने बदलली; पण निसर्गाशी असलेले त्यांचे नाते आणि निरीक्षणातून विकसित झालेले ज्ञान आजही जिवंत आहे.पक्ष्यांच्या हालचाली ओळखणे, घरटी शोधणे, प्रजननाचे हंगाम समजणे, प्राण्यांच्या वर्तनाचा अंदाज घेणे हे ज्ञान त्यांनी कोणत्याही पाठ्यपुस्तकातून नव्हे तर फासे पारधी समुदायातील मुलांनी त्याच्या जीवनाच्या अनुभवातून मिळवले आहे.
याच ठिकाणी शिक्षणाची खरी भूमिका सुरू होते. शिक्षण म्हणजे मुलांच्या अनुभवविश्वाची दखल घेणे, त्यांच्या आधीपासून असलेल्या ज्ञानाला मान्यता देणे आणि त्याला विधायक दिशा देणे. शिकारीची कौशल्ये जैवविविधतेच्या संरक्षणासाठी कशी वापरता येतील, निसर्ग निरीक्षणातून संशोधनाची दृष्टी कशी विकसित करता येईल आणि जगण्यासाठीच्या जुन्या सवयींना शाश्वत पर्याय कसे मिळवून देता येतील, हे शिक्षणाने शिकवणे आवश्यक आहे.
झेप संस्थेद्वारा चालवल्या जात असलेल झेप लर्निंग सेंटर अशाच प्रयत्नांमधून आम्ही काम करत आहोत. येथे मुलांना केवळ अभ्यासक्रम शिकवला जात नाही, तर निसर्गाविषयी संवेदनशीलता, जीवसृष्टीबद्दल आदर त्यांच्या जीवनानुभवांना शिक्षणाशी जोडून या सेंटर मध्ये शिकवलं जातं. मुलासोबत घडलेल्या अनुभव येणाऱ्या अशा घटना आमच्यासाठी अडचणी नाही आहेत ते मुलासोबत संवाद सुरू करण्याची, आणि शिक्षणाला वास्तवाशी जोडण्याची आमच्याकडे संधी असते.
---


Comments
Post a Comment