रेषांच्या वाटेने शिकण्याचा आनंद.
आज आमच्या झेप लर्निंग सेंटरमध्ये मुलांसोबत एक साधी वाटणारी, पण खूप काही शिकवून जाणारी ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. व्हाईटबोर्डवर वळणावळणाच्या रेषा काढून त्यामध्ये काही घरे आणि एक शाळा दर्शवण्यात आली होती. मुलांना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग शोधायचा होता.
पहिल्या नजरेत मुलांना हा एकखेळवाटला पण मुलं जेव्हा या रेषांचा मागोवा घेऊ लागली, तेव्हा शिकण्याची एक वेगळीच प्रक्रिया सुरू झाली. कोणती वाट योग्य असेल? कुठे वळायचे? कोणता मार्ग शाळेपर्यंत पोहोचवेल? अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना मुलं सतत विचार करत होती, निर्णय घेत होती आणि स्वतःच्या निरीक्षणांचा वापर करत होती.
या प्रक्रियेदरम्यान मुलांनी त्यांच्या रोजच्या शाळेच्या प्रवासाबद्दलही सांगितले. घरापासून शाळेपर्यंत जाताना त्यांना दिसणारी झाडे, घरे, दुकाने, मंदिर, रस्ते, त्यांचे रंग आणि आकार याबद्दल त्यांनी उत्साहाने चर्चा केली. एका साध्या रेषेने मुलांच्या अनुभवविश्वाचे दार उघडले होते.
या लेसन चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना दिलेले स्वातंत्र्य. त्यांना कोणताही तयार मार्ग किंवा उत्तर देण्यात आले नाही. प्रत्येक मुलाने स्वतः मार्ग शोधला, चुका केल्या, पुन्हा प्रयत्न केले आणि योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचले. यामुळे त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास अधिक बळकट झाला.
आजच्या काळात मुलांचा स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. मोबाईल आणि स्क्रीनवरील तयार माहिती मुलांपर्यंत सहज पोहोचते; परंतु विचार करण्याची, शोध घेण्याची आणि अनुभवातून शिकण्याची संधी कमी होताना दिसते आहे. अशा परिस्थितीत सेंटर मध्ये प्रत्यक्ष सहभाग, संवाद आणि खेळ यांच्या माध्यमातून शिकण्याचे अनुभव निर्माण करणे अधिक महत्त्वाचे ठरते अस आम्हाला वाटत.
झेपच्या लर्निंग सेंटरमध्ये आम्ही अशाच छोट्या पण अर्थपूर्ण उपक्रमांद्वारे मुलांना शिकण्याचा आनंद अनुभवण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतो.आमचा विश्वास आहे की शिकणं हे केवळ उत्तरं मिळवण्याची प्रक्रिया नसून, प्रश्न विचारण्याची,शोध घेण्याची एक आनंददायी वाटचाल आहे.!!
---

Comments
Post a Comment