वर्गातल्या गोष्टी...
वर्गातल्या गोष्टी...
अक्षरभूमी शाळेत शिकायला येणाऱ्या गट्टू च्या बाबानी बाहेर गावातल्या गाई महिन्याने चरायला घेतल्या आहेत, एक दिवस त्यांना रानात गाई चारतांना तितराची(gray froncolin bird)अंडी दिसली, संध्याकाळी गट्टू च्या बाबाने गट्टू ला सांगितलं आज मी रानात चील्हाटी च्या झुडपां खाली तितराचे अंडे पहिले आहेत, उद्या आपण त्या तितराला पकडायला जाऊ या. बाबाची ही गोष्ट ऐकुण गट्टू ला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी गट्टू नी वर्गातला मित्र सजन ची सोबती केली, खन्दारू आणि जाळी घेऊन बाबाच्या मागे रानात गेले, गट्टू म्हणाला दादा आम्ही बाबा सोबत गेलो रानात तर खरच चील्हाटी च्या झुडूपात तितर बसलेला होता. बाबा ने आम्हाला हो हो असा आवाज करायला सांगितला, हा आवाज ऐकुण तितर आंग चोरून घरट्यात दबायला लागला. बाबाने चील्हाटी च्या झुडुपावर अलगत जाळी फेकली. आणि समोरच्या बाजूने जाऊन तितरावर माती छीडकायला लागला, माती तितराच्या अंगावर पडल्याने खडबडून तितर उडाला आणि जाळ्यात जाऊन अडकला. शिकार साधली बाबाने जाळ्यातून तो तितर बाहेर काढला आणि तितराच्या दोन्ही पाखड्या वरचे पख कमी करून आमच्या हातामध्ये दिला, तेव्हा मला खूप आनंद झाला होता.
पुढे आम्ही गट्टू ला विचारलं त्या तितराच आणि अंड्याच काय केल मग तुम्ही खाल्ले का भाजून? गट्टू म्हणाला नाही नाही दादा. त्या तितराला मी घरच्या पिंजऱ्यात आणून सोडल, आणि अंडी भी सोबत आणलीय सहा अंडी आहेत. परंतु त्यातलं एक अंड टीचरल आहे. घरातल्या जुन्या मातीच्या भरण्यात ती अंडी ठेवली आहेत सध्या. पुढे मी म्हणालो त्या तितराला पोसायचा विचार करतो आहे का?
गट्टू होय म्हणाला. आणि त्याला काय खाऊ घालतोय मग? गट्टू म्हणाला रानातल्या गोवऱ्या असतात ना दादा त्या वेचून आणतो सुख्या गोवऱ्याच्या खाली लाल, बारीक किडे असतात, ते किडे टिपून तितर मस्त खातो. गट्टू ची ही गोष्ट ऐकल्यावर वर्गातला डिगा म्हणाला होय दादा एकदा आज्जी ने मला ही तीतराची अंडी भाजून खाऊ घातलेली आठवते, आपल्या कोंबडीच्या अंड्या पेक्षा थोडा मलका वास येतो पण त्याचा. गट्टू कडून ही गोष्टी ऐकल्या नंतर वर्गातली मुल सामूहिक वाचन करायला लागली.!!
- साहेबराव राठोड
अक्षरभूमी शाळा, झेप संस्था.

Comments
Post a Comment